7 संभाव्य कारणे ज्यांमुळे तुम्हांला वाटू शकतं तुमच्यामध्ये काही कमी आहे.



"काही चुकतंय का माझं?" 

"काही कमी आहे का माझ्यामध्ये?" 

वाटतं का असं कधी तुम्हांला? असं जर तुम्हांला वाटत असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही एकटेच नाही असं वाटणारे या जगामध्ये. सगळ्यांच्याच मनात हा विचार कधी ना कधीतरी येतो किंवा येऊन गेलेला असतो.

काय बरं असू शकतात अशा विचारांची संभाव्य कारणे, हेच सांगणार आहे मी माझ्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये. तर माझा आजचा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.

मी किर्ती मिलिंद सहानी, तुमची सेल्फ कोचिंग कोच. येत्या तीन वर्षात कमीत कमी दहा हजार व्यक्तींना सेल्फ कोचिंग टेक्निक्स शिकवून त्यांचं लाईफ अधिक आनंदी, समाधानी, संतुलित आणि अधिक प्रॉडक्टिव्ह बनवण्याचा माझा ध्यास आहे.

कधी कुणाच्या मनात क्षणभरासाठी स्वतःवर संशय येतो, तर कधी कुणाला जन्मभर स्वतःच्या क्षमतेबद्दल, स्वतःच्या प्रतिमेविषयी वैषम्य वाटत राहतं. कधी कुणाच्या मनात आपण हवे तितके सक्षम नाही किंवा आपण कुठेतरी कमी पडतोय असे विचार सतत येत राहतात. काही व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात आलेल्या वर्तमान परिस्थितीत आपण पुरे पडू काय याबद्दल शंका येत रहाते.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा असा एखादा विचार, अशी एखादी भावना तुमच्या मनात येईल तेव्हा तिला टाळून दूर सारू नका. त्यापेक्षा आयुष्यात थोडं थांबा आणि त्या विचाराला,त्या भावनेला सामोरे जा. त्यांना पूर्णपणे अनुभवा, समजून घ्या. जर तुम्हांला स्वतःच एकट्याने ही गोष्ट करणे अवघड जात असेल तर तुम्ही एखाद्या व्यवसायिक मानसोपचारतज्ञाची मदत देखील घेऊ शकता. एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा की तुम्ही निश्चितच अशा काही गोष्टी करू शकाल ज्यांनी तुम्हांला आयुष्यात पुन्हा एकदा स्वतःबद्दल चांगलं वाटायला लागेल आणि तुमचा स्वतःच्या क्षमतांवरचा विश्वास दृढ होईल.


तुमच्या स्वतःमध्ये काहीतरी चूक असण्याच्या विचारांवर उपाय शोधण्याआधी तुम्ही त्या विचारांच्या मागची कारणं शोधणं अतिशय गरजेचं आहे. आयुष्यातल्या एखाद्या छोट्याशा तात्कालीन अपयशापासून ते दीर्घकालीन आजारातपर्यंत कितीतरी कारणे, घटना, प्रसंग अशा विचारांना कारणीभूत ठरू शकतात. काहीतरी कमी आहे तुमच्यात किंवा काही तरी चुकतंय तुमचं, अशा तुमच्या विचारांना पुढे नमूद केलेल्या कारणांपैकी एखादं कारण असू शकतं का? पहा बरं तपासून तुमच्या आयुष्यात आहे का असं काही, ज्याला तुम्ही तुमच्या विचारांशी जोडू शकता!

1: तुमच्या भावनांचा उद्रेक झाला आहे का?




बऱ्याचदा जेव्हा तुम्हांला असं वाटतं की तुमच्यात काहीतरी कमी आहे तेव्हा असं होतं का, कि असा एखादा अनुभव, एखादी घटना,एखादी व्यक्ती तुमच्यावर असा परिणाम करतात आणि कसं व्यक्त व्हावं, काय भावना दाखवाव्यात हेच तुम्हांला समजत नाही? कसं सामोरं जावं एखाद्या घटनेला ते उमगत नाही तुम्हांला? जेव्हा असं वाटतं की तुमच्यात काहीतरी कमी आहे तेव्हा विचार करा कि कशामुळे असेल असं? तुमच्या आयुष्यात कदाचित त्या वेळी खूप आवाहने,अडचणी, संकटे किंवा जबाबदाऱ्या असतील. कदाचित तुमच्याकडून अधिक कामाची अपेक्षा असलेली नोकरी करत असाल तुम्ही त्यावेळी,  एकाचवेळी संसाराच्या खुपशा जबाबदार्‍या पार पाडत असाल तुम्ही, आर्थिक टंचाईच संकट आलेलं असू शकेल तुमच्यावर किंवा  अशाच अजूनही परिस्थिती असू शकतात ज्यामुळे तुम्ही एकाच वेळी सगळ्या गोष्टींना न्याय देऊ शकला नाहीत तर निश्चितच तुमच्यातच काहीतरी कमी असण्याची भावना तुमच्या मनात येऊ शकते.

2. तुम्हांला लाईफमध्ये अडकल्यासारखे वाटते आहे का? 




असं काही घडलं आहे का तुमच्या आयुष्यात की तुम्हांला लाईफमध्ये एकाच ठिकाणी अडकल्यासारखं वाटतंय? कधी तुम्ही नोकरीत प्रगती होत नाही म्हणून अडकल्यासारखे फील(feel) करत असता तर कधी तुमच्या एखाद्या नात्यामध्ये तुमची घुसमट होत असते. तुमच्या लाईफ जगण्याच्या काही विशिष्ट कल्पना असतील आणि तुम्हांला तुमच्या कल्पनांप्रमाणे जगायला मिळत नसेल तर निश्चितच तुम्हांला तुमच्यात काहीतरी कमी, काहीतरी चुकीचं आहे असंच वाटणार.

3: तुम्हांला एकाकीपणा जाणवतो का?




आयुष्यात बऱ्याच गोष्टींमुळे तुम्हांला एकाकी वाटू शकते. कदाचित तुमच्या नातेवाईकांशी तुमचे नातेसंबंध दुरावले असतील नाहीतर नवीन मित्र-मैत्रिणी बनवायचं अवघड झालं असेल, नाहीतर तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचं कौतुक होत नसेल ऑफिसमध्ये. जेव्हा असे सामाजिक संबंध जोडायला तुम्ही अपयशी ठरता तेव्हा तुम्हांला एकटेपणा अनुभवायला मिळतो. या एकटेपणातूनच तुमच्या स्वतःमध्ये काही कमी आहे का असा विचार तुमच्या मनात सहजपणे येऊ शकतो.

4: तुम्ही एखादा जबरदस्त मानसिक आघात अनुभवला आहात का?




तुमच्यावर लाईफमध्ये जर एखादा जबरदस्त आघात झाला असेल किंवा एखाद्या धक्कादायक अनुभवातून तुम्ही जात असाल, तर तुम्ही स्वतःला हे म्हणणं किती योग्य आहे की तुमच्यात काही कमी आहे का? एखादा असा प्रसंग ज्यात तुम्ही जवळच्या व्यक्तीला गमावून बसता तर कधी तुम्ही हिंसेला, जुलमाला,अत्याचाराला बळी पडता, तर कधी एखाद्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देता अशा वेळी तुम्हांला सहजच वाटू शकतं की तुमच्यातच काही कमी आहे. अशा जबरदस्त आघातांचा अतिशय महत्त्वपूर्ण परिणाम तुमच्या मानसिकतेवर होऊ शकतो. अशावेळी एखाद्या मानसोपचारतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

5: तुम्हांला एखादा शारीरिक आजार झालेला आहे का? 




तुमच्यात काही कमी आहे का ह्या प्रश्नाचा तुमच्या शारीरिक अवस्थेशी सरळ संबंध असू शकतो. तुम्हांला एखादी शारीरिक व्याधी झाली असेल, काही नवीन लक्षणे दिसत असतील तुमच्या आधीच्या आजाराची किंवा अशी काही लक्षणे दिसत असतील ज्यांचे अजून निदान झालंच नसेल, तर तुम्ही गोंधळून जाणे, काय झालं आहे स्वतःला याची काळजी करणं स्वाभाविकच आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या स्वतःमध्ये काय कमी आहे हा विचार मनात येणे नैसर्गिकच आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही डॉक्टर्सच्या मदतीने मिळवू शकता.

6: तुम्हांला स्वतःची किंमत आहे का?




बरेचदा तुमच्यात काही कमी आहे का या प्रश्नाचा उगम तुमच्या नजरेत स्वतःला महत्त्व नसण्यामध्ये असतो. अशावेळी सद्य परिस्थिती काय आहे यापेक्षा तुमची स्वतःबद्दलची प्रतिमा काय आहे हे तुमचा माईंड-सेट ठरवतो. जेव्हा तुम्हांला स्वतःची किंमत नसते तेव्हा याचा परिणाम तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक अंगावर होतो, अशा वेळी तुम्ही कुठल्याच अंगात पूर्णपणे सक्षम किंवा पुरेसे आहात असं तुम्हांला वाटत नाही .अशा वेळी तुमच्या आयुष्यातली तुमची मुल्ये तपासून पाहणं गरजेचं आहे. अशा स्वतःला कमी लेखणाऱ्या, तुमच्या मनामध्ये खोलवर रुजलेल्या, लाज आणि अपराधीपणाच्या भावनांचे समूळ उच्चाटन केले पाहिजे.


7: तुमचे मानसिक आरोग्य बिघडलेले आहे का?




नैराश्य (Depression),चिंतायुक्त  (Anxiety Disorder) किंवा पर्सनॅलिटी डिसऑर्डर (Personality Disorder) अशा मानसिक आजारांमुळे देखील तुमच्या मनात असा विचार येऊ शकतो की तुमच्यात काही कमी तर नाही? अशा परिस्थितीत व्यावसायिक तज्ञांचा सल्ला घेणे हे योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळणे होऊ शकते पण तुम्ही स्वतः देखील तुमच्यात परिस्थितीचा सामना करण्याची कौशल्ये विकसित करून तुमचं मानसिक आरोग्य सुधारू शकता.

या सगळ्या संभाव्य शक्यतांना यशस्वीरित्या हाताळण्याची काही महत्त्वाची कौशल्ये बघूया आपण माझ्या पुढील ब्लॉगमध्ये. माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार. 

सेल्फ कोचिंग टेक्निक्सबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझा 'अंतर्मनाच्या गुजगोष्टी' हा फेसबुक ग्रुप खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा.

FB Group Link: www.facebook.com/KirtiSelfCoach/

FB Page Link: https://www.facebook.com/groups/823092068235568/?ref=share 

सेल्फ कोचिंग टेक्निक्सच्या प्रवासात माझी साथ द्या. लौकरच येणाऱ्या माझ्या नवीन ब्लॉगची वाट पहा. 

धन्यवाद!

टिप्पण्या

  1. खूपच सुंदर ब्लॉग किर्ती ताई
    7ही मुद्दे जबरदस्त

    उत्तर द्याहटवा
  2. खरोखर खूप छान पॉईंट मांडलेले आहेत कीर्ती ताई तुम्ही या ब्लॉग मध्ये..!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

4 महत्त्वाचे घटक जे वाढवतात तुमची आंतरिक प्रेरणा